पुणे प्रतिनिधी । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची पहिली कसोटी पुण्यात सुरू आहे. टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने कसोटीच्या पाहिल्या दिवशी कारकिर्दीतील सलग दूसरे शतक साजरे केले. रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणाऱ्या मयांकने आज दणदणीत शतक ठोकले असून भारताने शतकांच्या जोरावर अर्ध्या दिवसातच २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पहिला सामना शतकांची बरसात करून पहिली कसोटी गाजवणारी मयांक आणि रोहितची जोडी आज मैदानात उतरली. मात्र, सलामीची जोडी आज लवकर फुटली. रोहित शर्मानं ३५ चेंडूत अवघ्या १४ धावा केल्या. कागिसो रबाडानं त्याला बाद केलं. त्याच्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारासोबत मयांकनं खेळपट्टीवर नांगर टाकला आणि शतक पूर्ण केलं. पुजारानंही त्याला उत्तम साथ देत अर्धशतक साजरं केलं. त्यानं ११२ चेंडूत ५८ धावा केल्या. पुजारा देखील रबाडाच्याच एका चेंडूवर फसला आणि झेलबाद झाला. त्यानंतर रबाडानेच मयांकला फाफ ड्युप्लेसिसकरवी झेलबाद केले. मयांकनं १९५ चेंडूत १०८ धावा केल्या. आतापर्यंत फक्त पाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेल्या मयांकच्या नावावर दोन शतके आणि तीन अर्धशतके आहेत.