रस्त्यावर सभा घेऊ देण्याबाबत मनसेचे निवडणूक आयोगाला पत्र

raj thackeray

 

मुंबई प्रतिनिधी । परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे मैदानांवर चिखलाचे साम्राज्य तयार झालेय. अशा स्थितीत सभेसाठी आरक्षित मैदानांवर प्रचारसभा घेणं अशक्य झाले आहे. त्यामुळेच शहरांमधील रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र मनसे तर्फे निवडणूक आयोगाला नुकतेच पाठविण्यात आले आहे.

राज ठाकरे यांची पहिलीच प्रचारसभा पुण्यात होणार होती. राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. पण पावसामुळे मैदानात चिखल झाला आणि सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आता मैदानांऐवजी रस्त्यावर प्रचारसभा घेण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी मनसेने केली आहे. पाऊस लांबला आहे. मैदानांमध्ये पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे. त्यामुळे सभा घेण्यात अडचणी येत आहेत. रस्त्यांवर सभा घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र मनसेने राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवले आहे.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी निवडणूक प्रचार सभा आयोजित केल्या आहेत. प्रचारसभांसाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक शहरांतील खासगी मैदाने आरक्षित केली आहेत. मात्र लांबलेल्या पावसामुळं आणि वादळामुळे मनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभा रद्द होत आहेत. पावसाच्या पाण्यामुळं मैदानात चिखल होतो. पाऊस थांबला तरी चिखलात श्रोत्यांसाठी आसनव्यवस्था करता येत नाही, असं मनसेनं या पत्रात म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या रद्द झालेल्या सभेचाही उल्लेख केला आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारसभा पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघामधील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात आयोजित केली होती. मात्र, अर्धा तास पाऊस पडला आणि पावसाच्या पाण्यामुळं मैदानात चिखल झालं. पाऊस थांबूनही चिखल असल्यानं सभा रद्द करावी लागली, असं या पत्रात म्हटलं आहे.

Protected Content