मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची आमची इच्छा आहे. मात्र आमच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची शिवसेनेने मानसिकता तयार करावी. शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास त्यावर गंभीरपणे विचार करता येईल, अशा स्पष्ट शब्दात सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खुली ऑफर शिवसेनेला दिली आहे.
निवडणूक निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जनमताचा कौल पाहता मतदारांनी भाजप आणि शिवसेनेविरोधात कौल देऊन त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खऱ्या अर्थाने हा सत्तेविरोधातील कौल आहे, असे थोरात यांनी सांगितले. शिवसेनेकडून सत्ता स्थापण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, पण त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रस्ताव आल्यावर विचार करू, असेही थोरात यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसची ही ऑफर शिवसेना स्विकारणार का? याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागले आहे.