सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाकडून संगणकीय प्रणालीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी महत्त्वाच्या ऑनलाइन सेवांना तात्पुरती स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो नागरिकांना काही दिवस ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजल्यापासून ते रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत महाभूमी व महसूल विभागाच्या सर्व संगणकीय सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. या कालावधीत कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया किंवा सेवा उपलब्ध होणार नसल्याने नागरिकांनी आपली कामे यापूर्वीच पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंद राहणाऱ्या सेवांमध्ये महाभूमी पोर्टलवरील अत्यंत महत्त्वाच्या ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, ‘क’ प्रत तसेच फेरफार संबंधित सेवा (डिजिटल साइन व View Only) यांचा समावेश आहे. याशिवाय नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा तसेच GRB पोर्टलवरील सर्व सुविधा देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. त्यामुळे जमीन व्यवहार, मालमत्ता नोंदणी आणि इतर शासकीय प्रक्रिया काही काळासाठी ठप्प होण्याची शक्यता आहे.
भूमि अभिलेख विभागाने या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, प्रणाली अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी ही देखभाल व दुरुस्ती अत्यावश्यक आहे. भविष्यातील सेवा अधिक सुरळीत आणि जलद देण्यासाठी हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.
अप्पर जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे श्री विकास गजरे यांनी नागरिकांना तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना या कालावधीची नोंद घेऊन आवश्यक कामांचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी वेळेत कामे पूर्ण करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.



