Home प्रशासन ज्वारी-मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू 

ज्वारी-मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू 


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि ज्वारी-मका खरेदी प्रक्रियेला पारदर्शक व सुलभ करण्यासाठी भडगाव शेतकरी संघाने ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आज 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजेपासून ही सुविधा सुरू होत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या नाव नोंदणी करता येणार असून खरेदी प्रक्रियेत होणारा गोंधळ टाळण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी 7 व 10 एप्रिल रोजी ज्वारी टोकन वाटपाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी झाली होती, ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी टोकन वाटप प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

शेतकरी संघाने दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करताना शेतकऱ्यांना आपले नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, पिकाचा प्रकार (ज्वारी किंवा मका) आणि गावाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. एका मोबाईल क्रमांकाचा वापर जास्तीत जास्त पाच वेळा करता येणार असून प्रत्येक ऑनलाईन टोकनवर एका शेतकऱ्याचीच नोंदणी वैध मानली जाणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना स्क्रीनवर टोकन क्रमांक प्राप्त होईल, ज्याची पीडीएफ डाउनलोड करून प्रिंट काढणे किंवा मोबाईलमध्ये जतन करणे बंधनकारक राहणार आहे.

नोंदणीच्या वेळी ऑनलाईन किंवा प्रिंट टोकन सादर करणे आवश्यक असून त्यामधील माहितीची खातरजमा करण्यात येणार आहे. टोकनवरील माहिती आणि प्रत्यक्ष सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित टोकन रद्द करण्यात येईल आणि पुढील क्रमांकाच्या शेतकऱ्याला संधी दिली जाईल. शासनाने नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी संघाचे चेअरमन राजेंद्र परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ऑनलाईन प्रणाली अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे. या निर्णयाची माहिती शेतकरी संघ आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी उपसभापती हिरामण पाटोळे, संचालक अमोल पाटील, योजना पाटील, प्रभाकर पाटील, जे. के. पाटील, अमोल सुरेश पाटील, जयवंत पाटील, भीमराव पाटील, रायचंद परदेशी, गुलाब पाटील, शाताराम पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound