जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाला ऑनलाईन फसविणाऱ्या संशयित आरोपीला सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली आहे. गौरव गौतम बर्मन (वय २४, रा. राजरहाट, गोपालपूरा, कोलकाता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, जामनेर येथील चेतन कन्हैया फिरके वय ३१ यांची ८ लाख ७५ हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. चेतन फिरके यांच्या व्हॉटस् अप व टेलिग्राम आयडीवर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२३ या दरम्यान एका जणाने संपर्क साधत त्यांना टास्क देऊन तो पूर्ण करून त्यात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे सांगितले. त्यासाठी या अनोळखीने फिरके यांच्याकडून वेळोवेळी एकूण आठ लाख ८२ हजार रुपये स्वीकारले. त्यापैकी टास्क पूर्ण केल्याबद्दल भरलेल्या एकूण रकमेपैकी केवळ सहा हजार ८२५ रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. उर्वरित नफा व मुद्दल रक्कम मात्र परत केली नाही.
फिरके यांना सांगितल्याप्रमाणे नफा व त्यांची रक्कम दिली नाही. मात्र त्यांना एक बनावट पत्र दिले असून त्यावर विदेशातील एका स्टॉक एक्सचेंजचे नाव आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सायबर पोलीस कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यानुसार तपासात गौरव गौतम बर्मन (वय २४, रा. राजरहाट, गोपालपूरा, कोलकाता) याने हा गुन्हा केल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी गौरव बर्मन याला रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता कोलकत्ता येथून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार, पोहेकॉ हेमंत महाडिक, पोहेकॉ मिलिंद जाधव यांनी परिश्रम घेतले.