जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील द्रौपती नगरातील तरूणीला कुरीअर कंपनीचे नाव सांगून पार्सलमध्ये ड्रक्स असल्याची बतावणी करत तब्बल ३ लाख २६ हजार ८७ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील द्रौपती नगरात ३२ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदररनिर्वाह करतात. शनिवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास तरूणीला एका मोबाईल नंबरवरून फोन आला. फेडेक्स कुरीअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने अंधेरी मुंबई येथून तैवान येथे एक पार्सल आले आहे. यात क्रेडीट कार्ड, पासपोर्ट, ड्रक्स असल्याचे सांगितले. त्यानंतर ड्रक्स असल्याचे खोटे सांगून त्याने सायबर क्राईमशी बोलणे करून दिले. त्यावेळी तरूणीकडून बँकेची माहिती विचारून घेतली. त्यानंतर तरूणीच्या बँक खात्यातून ३ लाख २६ हजार ८७ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे करीत आहे.