महिलेची ऑनलाईन फसवणूक ; आरोपी अटकेत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील गजानन कॉलनीतील महिलेची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कॉंग्रेस नारायण कुढेही वय  २६ रा. पंडापदर, ता.रामपुर जि.कालाहंडी , ओरिसा असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याला शुक्रवार १८ मार्च रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील रहिवासी अनुपमा प्रभात चौधरी यांना केवायसी करण्यासंदर्भात अनोळखी इसमाचा फोन आला होता. यादरम्यान संबंधिताने एक लिंक मोबाइलवर पाठवली तसेच आलेल्या ओटीपी क्रमांक मिळून अनुपमा चौधरी यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने दहा हजार रुपये काढुन घेतले होते. याप्रकरणी अनुपमा चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत संशयित निष्पन्न केला. यात संशयित हा ओरिसा राज्यातील असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक रामदास वाकुडे यांनी संशयितांच्या शोधार्थ  हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील, पोलिस नाईक सलीम तडवी, पोलिस कॉन्स्टेबल विकास पहुलकर यांचे पथक ओरिसा राज्यात रवाना केले.

संशयित ज्या भागात वास्तव्यास होता तो भाग नक्सलाईट होता. कुणालाही संशय येऊ नये म्हणून   पथकातील कर्मचार्‍यांनी तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांप्रमाणेच पेहराव केला. व तपासाची चक्रे फिरवत संशयित काँग्रेस कुढेही याच्या मुसक्या आवळल्या.  अटक करून त्याला गुरुवारी जळगावात आणण्यात आले . शुक्रवारी त्याला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Protected Content