सायबर ठगाकडून एकाची साडेतीन लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईलवर लिंक पाठवून प्ले-स्टोअरमधून आयएसएल ॲप डाऊनलोड करायला सांगून सायबर ठगाने ऑटो डिलरशिपचे काम करणाऱ्‍या नशेमन कॉलनीतील प्रौढाला ३ लाख ५० हजाराचा बऑनलाइन चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी २३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रिझवान अली लियाकत अली सैय्यद (वय-४५) रा. नशेमन कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ई-कार्ड लॉजिस्टीक या कंपनीकडून ऑनलाइन शेविंग प्रोडक्ट मागविले होते. खराब प्रोडक्ट मिळाल्यामुळे रविवारी २२ जानेवारी दुपारी ४ वाजता त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधला. त्यावेळी त्यांना कंपनीकडून फोन येईल, तेव्हा तक्रार करा सांगण्यात आले. काही वेळानंतर रिझवान अली यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. संबंधित व्यक्तीने रिझवान यांना लिंक पाठवून प्ले-स्टोअरमधून आयएसएल ॲप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर तीन तासानंतर त्यांच्या खात्यातून ५० हजार रूपयांचे सात ट्रान्झॅक्शन झाल्याचा एसएमएस त्यांना प्राप्त झाला. त्यांची एकुण ३ लाख ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक झाली. त्यावेळी त्यांना लक्षात आले की, आपली फसवणूक झाली. अखेर सोमवारी २३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता प्रौढाने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार साडेतीन लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content