जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली आदर्श नगरात राहणाऱ्या एका खासगी कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल १२ लाख ६७ हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश वसंत हेबाळकर (५४, रा. आदर्श नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला आहे. योगेश हेबाळकर यांच्या व्हाटस ॲप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून त्यांना ट्रेडिंग गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून १८ डिसेंबर २०२३ ते ७ मार्च २०२४ या दरम्यान वेळोवेळी एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपये ऑनलाईन पद्धतीने विविध बँक खात्यावर स्वीकारले. त्यानंतर मात्र त्यांना कोणताही नफा, मोबदला न देता मुद्दल रक्कमही दिली नाही. वारंवार पाठपुरावा करून आपली रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हेबाळकर यांनी शनिवारी ६ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एका इंस्टीट्युशनच्या व्हाटस् ॲप क्रमांकासह अन्य दोन अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.