रावेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच ऑनलाईन ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
त्यात आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर यावल या तालुक्यात केळी हे प्रमुख पिक असल्याने केळी संशोधन केंद्र रावेर किंवा यावल या तालुक्यात असावे. तसेच जिल्ह्यात सर्वात जास्त खतांची मागणी असल्याने रेल्वे वँगन सावदा, निंभोरा व दुसखेडा येथे खतांचा रँक लावावा, अशी ही मागणी केली आहे.
ती मागणी पालकमंत्र्यानी तत्व मान्य केली आहे. मागील वर्षाच्या प्रमाणे यावेळी बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीवर अंकुश लावला गेला पाहिजे. केंद्र सरकारने खतांच्या किंमती 40 ते 50 टक्क्यापर्यंत वाढवून बळीराजावर अन्याय केला आहे. त्या किंमती कमी करण्यासंदर्भात राज्यशासनाने ही प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली.
तसेच रावेर यावल तालुके बागायती तालुके असल्याने यंत्र आणि अवजारांची आवश्यकता जास्त असल्याने यांत्रिकीकरण योजनेतून जास्तीत जास्त लाभ घ्यावा व सदर योजना वर्षभर सुरू असावी. तसेच ठिंबक सिचन साठी मिळणारी सबसिडी यांत्रिकीकरणातून वगळून ई-ठिंबक प्रणाली ऊन्ह सुरू करून सबसिडी लवकर मिळण्यासाठी विशेष प्रयत्न असावेत. त्याच प्रमाणे केळी पिक विम्याबाबत ही पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून पूर्वीचेच निकष लागू करण्यात यावेत ही मागणी केल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.
कोरोना काळात रासायनिक खत विक्री करणाऱ्या कृषी विक्रेत्यांना पॉस मशीन ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन करून द्यावे तसेच या परिसरात केळी पिकासाठी रासायनिक खतांची मात्राबजास्त लागत असल्याने प्रति शेतकरी ५०बॅगची अट रद्द करावी व कृषी विक्रेते तसेच त्यासाठी मार्केटिंगचे कार्य करणाऱ्या तरुणांना लसीकरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली.
या खरीपपूर्व आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधिकारी, आमदार, खासदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनीधी ऑनलाईन पध्दतीने सहभागी होते.