जळगाव प्रतिनिधी । पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2021-2022 करीता राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पध्दतीने 4 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा परिषद जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे प्रयत्न केलेला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेंर्गत प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. आता यावरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये म्हणून तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सुविधा केली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमानुसार लाभार्थी हिस्सा व अन्य बाबींसाठी नियोजन करणे शक्य होणार आहे.
नावीण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+ 3 तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीने निवड करण्यात येईल. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालनापैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईलवर AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअरवर 4 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये.
लाभार्थी निवडीचा कृती आराखडा असा : 4 ते 18 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारणे, 19 डिसेंबर 2021 रोजी डाटा बॅक अप करणे, 22 ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत रँडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड, 30 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 या कालावधीत लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, 6 ते 9 जानेवारी 2022 या कालावधीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड पूर्ण करणे, 10 जानेवारी 2022 रोजी अंतिम मान्यतेने कार्यारंभ आदेश देण्यात येतील.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक किंवा तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा परिषद जळगाव यांनी केले आहे.