जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरदिवसा घरासमोर बांधलेल्या बकऱ्या चारचाकी वाहनातून चोरुन नेणाऱ्यांना जमीन युसूफ शेख (वय ४७, रा. शिवाजीनगर) यांनी अडविले. यावेळी चोरट्यांनी त्यांना चारचाकीवाहनासोबत फरफटत नेवून लोखंडी हत्याराने त्यांच्या हातावर मारीत जखमी केले. ही घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील बोहरा मस्जीदसमोर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवाजी नगरातील बोहरा मस्जीदसमोर जमील युसूफ शेख हे वास्तव्यास असून ते बकरी पालनासह खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी घरासमोरील जागेवर त्यांच्या बकऱ्या बांधलेल्या होत्या. ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घराच्या गॅलरीत पाणी घेण्यासाठी गेले असता, त्यांना बकऱ्या बांधलेल्या ठिकाणी त्यांना (एमएच ०५, एएक्स ७८९८) क्रमांकाची कार उभी दिसली. तसेच दावणीला बांधलेल्या दोन बकऱ्या गाडीजवळ उभ्या होत्या आणि गाडीचे दोन्ही दरवाजे उघडे असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे जमील शेख यांना संशय आला आणि ते घाईघाईने खाली उतरले. दरम्यान, चोरट्यांनी एक बकरी चारचाकी वाहनात टाकली होती तर दुसरी वाहनात टाकत होते.
चोरटे बकरी गाडीत टाकत असतांना जमील शेख यांनी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या इसमाची मान पकडून त्याला गाडीच्या खाली ओढत होते. त्यावेळी त्या चोरट्याने शेख यांच्या हातावर लोखंडी हत्याराने मारले. शेख यांनी चोरट्याची मान घट्ट पकडून ठेवल्यामुळे गाडीच्या चालकाने गाडी सुरु करीत शेख यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले आणि चोरटे तेथून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी चोरट्यांनी चारचाकीतून २० हजारांच्या दोन बकऱ्या चोरुन नेल्या.
जमील शेख यांनी चोर चोर म्हणत आराडाओरड केल्याने त्यांचा मित्र उमर इसाक बागवान आणि त्याचा सहकारी जुबेर पिंजारी यांनी दुचाकीने चोरट्यांचा नशिराबादपर्यंत पाठलाग केला. यावेळी त्यांनी चोरट्यांच्या वाहनाची मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करुन ठेवली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.