भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बंगला नंबर १५ येथे घराची गॅलरी धुत असतांना पाणी अंगावर पडल्याच्या कारणावरून तीन जणांकडून एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जन्सस फ्रान्सीस मार्शल (वय-४७) रा. बंगला नंबर १५, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनीवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता जन्सस मार्शल हे त्याच्या घराची गॅलरी धुत असतांना त्याचे पाणी अंगावर पडले. याचा राग आल्याने याच परिसरात राहणारे निखील मंगल कोदली, राजेश सुरेश चंडाले आणि विशाल सुरेश चंडाले या तीन जणांनी जन्सस मार्शल यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जन्सस मार्शल यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून निखील मंगल कोदली, राजेश सुरेश चंडाले आणि विशाल सुरेश चंडाले सर्व रा. बंगला नं. १५, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहे.