नवीदिल्ली, वृत्तसंस्था | तब्बल २० कोटी भारतीय मनोविकाराने ग्रस्त असल्याची माहिती एका पाहणीतून समोर आली आहे. यासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला होता. २०१७ मध्ये प्रत्येक सात भारतीयांमागील एक भारतीय मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती यातून समोर आली आहे.
एका अभ्यासानुसार, दर सातपैकी एक भारतीय वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक विकारांनी ग्रस्त होता, त्यामध्ये नैराश्यग्रस्त आणि चिंताग्रस्तांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच या मनोविकारांमध्ये नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, बैद्धिक विकृती, आचरणासंबंधी विकार आणि ऑटिझम यांचा समावेश आहे. ‘इंडिया स्टेट लेवल डिसिज बर्डन इनिशिएटिव्ह’ या संस्थेने या संबंधी एक पाहणी केली होती. त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये ७.६ दशलक्ष भारतीयांमध्ये बायपोलार डिसऑर्डर असल्याची लक्षणे दिसून आली होती. यामध्ये गोवा, केरळ, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांचा सर्वाधिक समावेश होता, असे यात नमूद करण्यात आले आहे. तर गोवा, केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीतील ३.५ दशलक्ष लोकांमध्ये स्किझोफ्रेनियाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले होते. १९९० मध्ये मनोविकारांनी ग्रासलेल्यांचे प्रमाण २.५ टक्के इतके होते. तर २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन ते ४.७ टक्के झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१७ मध्ये भारतात नैराश्यग्रस्त लोकांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३३.८ टक्के इतके होते. तर चिंताग्रस्त लोकांचे प्रमाण १९ टक्के, बौद्धिक विकृतीने ग्रस्त असलेल्यांचे प्रमाण १०.८ टक्के तर स्किझोफ्रेनियाने ९.८ टक्के लोक ग्रस्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानुसार मानसिक आजार भारतातील आजाराच्या ओझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देत असल्याची प्रतिक्रिया एम्सचे प्राध्यापक राजेश सागर आणि ज्येष्ठ लेखक इंडियन एक्स्प्रेसशी दिली. “मानसिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी काही उपयायोजना करण्याची तसेच उपचारांमधील अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे. भिती दाखवल्याने किंवा धाक दाखवल्याने लहान मुलांना मनोविकार होण्याची शक्यता अधिक असते,” असेही त्यांनी नमूद केले.