यावल प्रतिनिधी । यावल- चोपडा राज्य मार्गावर काल रात्री मोटरसायकल वरील तरूणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुुसार यावल शहरापासुन साधारण एक किलोमिटरवर मध्यरात्रीच्या सुमारास संजय राजु तडवी (वय२२ वर्ष राहणार अहीरवाडी तालुका रावेर) हा काम आटोपून घरी येत होता. तो याच मार्गावर असलेल्या कैसरबाग हॉटेलवर कामास होता. काही दिवसापासुन बंद असलेले हे हॉटेल कालच सुरू झाले होते. यामुळे तो पहील्याच दिवसाचे काम आटोपुन सावखेडासीम येथे राहणारे मामा छब्बू बाबु तडवी यांच्या घरी मुक्कामासाठी जात होता. तो एम.एच.१९सिडी ७९०५ या क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना एका अज्ञात वाहनाने धडक दिलेल्याने तो जागीच मरण पावला, संजय राजु तडवी हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.
यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी आज सकाळी त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. दरम्यान, रमजान अब्दुल तडवी यांनी यावल पोलीसात फिर्याद दिल्याने अज्ञात वाहन चालकाच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत. या अपघाताबाबत राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष एम.बी तडवी यांनी सांगीतले की, भुसावळ-यावल-चोपडा या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहनांची वर्दळ वाढली असुन, यामुळे अपघात वाढले आहे. यामुळे वाहतुकीला आळा घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.