मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय ‘रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळा संपन्न झाली.
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन कबचौउमवि जळगावच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एच.ए.महाजन हे होते. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.संजीव साळवे (विद्यार्थी विकास अधिकारी) यांनी केले. त्यात त्यांनी नमूद केले की अशा कार्यशाळांच्या माध्यमातून समाजाची एक नवी सृजनशील पिढी निर्माण होण्यासाठी मदत होईल. तसेच शारीरिक इजा पोहचविणारे रॅगिंग कमी झालेले असले तरी मानसिक इजापोहचविणारे रॅगिंग कमी झालेले नाही त्यावरच प्रतिबंध करावा लागेल.
उद्घाटनपर मनोगतात प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी संचालक विद्यार्थी विकास विभाग कबचौउमवि जळगाव यांनी समाजाची नवनिर्मिती आणि उन्नत समाज निर्माण करण्यासाठी रॅगिंग प्रतिबंध अतिशय महत्त्वाचा असून तो केवळ महाविद्यालयापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजाच्या हिताचा असून, त्यादृष्टीने तरुण पिढीने मार्गक्रमण करावं व त्याद्वारे आपले आणि समाजाचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असा मोलाचा संदेश दिला. अध्यक्षीय मनोगतातून प्र. प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले. आणि समाजातून अश्या समाज विघातक प्रवृत्ती वर मात करण्यासाठी अश्या कार्यशाळा ची आवश्यकता प्रतिपादित केली.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक मा. प्रदीप शेवाळे यांनी त्यांच्या अनुभवातून आणि आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या व कायदा किती सक्षम आहे; यासंदर्भात भारतीय दंड विधान आणि रॅगिंग प्रतिबंध या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच दुसरे वक्ते ॲड. विनोद इंगळे यांनी भारतीय संविधान आणि त्यामध्ये रॅगिंग प्रतिबंध यावर असणाऱ्या कलमांचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट केले. त्यातून उत्तम समाजजीवनाचं गणित कसं मांडता येईल त्या संदर्भात मार्गदर्शन केले. तर प्रा. डॉ.अनिल शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठीची आचारसंहिता व आपली सर्वांची नैतिक जबाबदारी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचा समारोप प्रा. डॉ. पंकज नन्नवरे माजी संचालक विद्यार्थी विकास विभाग कबचौउमवि जळगाव यांच्या हस्ते पार पडला त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी पालक शिक्षक पर्यायाने समाज यांचीच जबाबदारी आहे कि रॅगिंग ह्या विकृतीला आपणच आळा घातला पाहिजे असे विषद केले.
कार्यशाळेचा समारोप कबचौउमवि जळगावच्या ‘विद्यार्थी विकास विभाग’चे माजी संचालक प्रा.पी.पी.लढे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी वरील सर्व मुद्द्याचे सविस्तर विवेचन केले व अशा कार्यशाळांची भविष्यात गरज पडणार नाही. अशी भावी पिढी निर्माण करण्यावर आपण शिक्षकांनी भर दिला पाहिजे हा कानमंत्र दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.प्रतिभा ढाके यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संजीव साळवे यांनी केले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रासेयो उप-प्राचार्य प्रा.डॉ. ए.पी.पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.व्ही.बी.डांगे, रासेयो सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. बावस्कर, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ठींगळे व प्रा.डॉ.अतुल बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभाग, कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.