श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ लागला आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीने बहुमताचा आकडा पार केला असून ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होतील, हे आता स्पष्ट झाले आहे. ओमर अब्दुल्ला यांचे वडील व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीच ही माहिती दिली आहे. असे करताना त्यांनी हरियाणातील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केले आहे. त्यांच्या अंतर्गत वादांमुळे त्यांचा पराभव झाला असेल, असे भाष्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे.
फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना आगामी सरकार स्थापनेबाबत भूमिका स्पष्ट केली. “दहा वर्षांनंतर लोकांनी आम्हाला बहुमताचा कौल दिला आहे. आमची अल्लाहकडे प्रार्थना आहे की आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू. जम्मू-काश्मीरमध्ये आमचे सरकार म्हणजे पोलीस राज नसून लोकांचं राज्य असेल. आम्ही तुरुंगात असणाऱ्या निर्दोष लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. माध्यामांना स्वातंत्र्य असेल. हिंदू व मुस्लिमांमध्ये आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल. मला आशा आहे की जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पु्न्हा मिळवून देण्यासाठी इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आमच्यासोबत उभे राहतील. मला असं समजलंय की ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील”, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.