अरे देवा . . .सेवानिवृत्तीच्याच दिवशी रेल्वे कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू !

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रेल्वे विभागात ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिवशी सुरेश मोहन सोनवणे (वय-६०, रा. वाकीरोड, जामनेर) या रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेश मोहन सोनवणे हे गेल्या ३२ वर्षांपासून रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स म्हणून नोकरीला होते. त्यांच्या वयाची ३१ मे रोजी साठ वर्षे पुर्ण झाल्याने आज त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्या निमित्ताने पाचोरा येथे त्यांच्या कार्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी भुसावळ येथील रेल्वे कार्यालयात देखील इतर कर्मचार्‍यांसोबत सत्कार होणार होता. बुधवारी ३१ मे रोजी पाचोरातील कार्यालयात सत्कार झाल्यानंतर ते दुपारी साडेबारा वाजता काशी एक्सप्रेसने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पाचोरा रेल्वे स्थानकात जवळील रेल्वे खंबा क्रं. ३७२/९/११  त्यांचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर  लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे मुख्य कर्मचारी तथा कल्याण निरीक्षक शिवशंकर राऊत आणि रामेश्वर निंबाळकर यांनी घटनास्थळी गाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. यासाठी रूग्णवाहिका चालक अमोल पाटील यांनी सहकार्य केले. दरम्यान त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत पाचोरा लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चाळीसगाव पोलीस दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे हे करीत आहे. मयताच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. या अपघाती मृत्यूमुळे रेल्वे कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत.

Protected Content