सावदा, ता. रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील विश्रामगृहावर महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावदा शहरातील नागरिक व पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत पत्रकार व नागरिकांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
बर्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गाची झालेली चाळण लक्षात घेता सावदा येथील तापी सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन,सावदा संस्थेच्या नेतृत्वाखाली दिनांक २३ रोजी सावदा येथे मोठे आंदोलन उभारले गेले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तात्काळ सुरू होईल व २५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल अशा आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलनाला स्थगिती दिली होती.
दरम्यान दि. २५ सोमवार रोजी सावदा येथे विश्रामगृहावर झालेल्या संयुक्त बैठकीत मोठ्या प्रमाणात नागरिक व पत्रकार उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी उपस्थित अधिकार्यांना प्रश्नांचा भडिमार करत रस्त्यावर अनेक अपघात होऊन जीव जात आहेत.तुम्ही रस्ता दुरुस्तीसाठी किती लोकांचा बळी घेणार आहात, महामार्ग नेमका दुरुस्त कधी होणार आहे. किती रुपये या महामार्गावर केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत आधी अधिकार्यांनी खुलासा करावा अशी मागणी नागरिकांनी लावून धरली त्यामुळे दोघं अधिकार्यांची चांगलीच गोची झाली. बैठकीदरम्यान येथे आठ दिवसांमध्ये सावदा शहर व सदर महामार्गावर परिसरात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे काम आठ दिवसात करण्यात येईल. असे अधिकार्यांनी आंदोलकांना आश्वासित केले.
याप्रसंगी आ. शिरीष चौधरी, भाजपचे लोकसभा प्रमुख नंदू महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, कोठारी शास्त्री भक्ती किशोरदास, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्त्या शमीभा पाटील, तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी व्ही. के. तायडे, सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सावदा मंडल अधिकारी विनोद वानखेडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शाखा अभियंता चंदन गायकवाड, ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट संस्थेचे अध्यक्ष शामकांत पाटील, पत्रकार प्रवीण पाटील ,कमलाकर पाटील ,पंकज पाटील, आत्माराम तायडे ,लाला कोष्टी ,रवींद्र हिवरकर, राजेंद्र भारंबे, जितेंद्र कुलकर्णी, शेख साजिद, राजू दिपके यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी भ्रमणध्वनीवरून अधिकारी व आंदोलकांशी चर्चा केली.
दरम्यान, सावदा शहर साईबाबा मंदिराजवळ,एलआयसी इमारती जवळ, सावदा फैजपूर एमआयडीसी जवळ,फैजपूर कब्रस्तान जवळ रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत असतात त्यामुळे,कायमस्वरूपी तोडगा काढून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी कॉंग्रेटी करण्याचा प्रस्ताव तयार करावा आणि केंद्राकडे सादर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनाची दखल घेऊन अधिकार्यांनी खड्डे बुजण्यात येतील अशी ग्वाही दिली असली तरी आता प्रत्यक्षात हे काम केव्हा सुरू होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.