बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके गेल्या १० दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात विविध तालुक्यातील ओबीसी बांधवांनी गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील गावा गावांतून प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनकर्त्यांनी बीड-अहमदनगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी ५ महिलांसह २५ आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण नको या मागणीसाठी बीड वडीगोद्री गावात आंदोलन सुरु आहे. प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले आमरण उपोषण आज १० व्या दिवशी स्थगित करण्यात आले. मात्र बीडच्या हतोल्यात मागील पाच दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ उपोषण सुरू आहे. आरक्षणाच्या संरक्षणासाठी महिलाही आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथे रस्त्यावर उतरत महिलांनी टायरची जाळपोळ केली. यामुळे बीड-अहमदनगर-कल्याण महामार्ग काही काळ बंद होता.
खिळद येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी मुंडन करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी बीड येथील विविध तालुक्यात ओबीसी समाज आंदोलन करत आहेत. हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथून शेकडो ओबीसी बांधव ट्रॅक्टर रॅलीने वडीगोद्रीमध्ये दाखल झाले. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, या मागणीसाठी अहमदपूर- अहमदनगर राष्ट्रीय मार्गावर पिंपळगाव घोळवे येथे ओबीसी बांधवांनीरास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतरओबीसी आरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासून उपोषणास बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण तुर्तास मागे घेतले आहे. सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर हाके म्हणाले की, सरकार आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही आमचे उपोषण तात्पुरते मागे घेत आहोत. आंदोलन फक्त स्थगित केले आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे.