ओबीसी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोपरांत भारतरत्न

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मोठी घोषणा केली आहे. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्यात येणार असल्याचे केंद्राने मंगळवारी जाहीर केले. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते आणि ते मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा संदर्भात राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेडने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. या घोषणेनंतर जेडीयूने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, ‘आम्हाला ३६ वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळाले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बिहारच्या 15 कोटी जनतेच्या वतीने केंद्र सरकारचे आभार मानतो.’
कर्पूरी ठाकूर यांचा जन्म पितोझिया गावात झाला होते जे समस्तीपूर जिल्ह्यात आहे. 1940 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केल्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. कर्पुरी ठाकूर यांनी समाजवादाचा मार्ग निवडला. 1942 मध्ये गांधींच्या असहकार चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगातही राहावे लागले होते.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 1945 मध्ये कर्पूरी ठाकूर समाजवादी चळवळीचा चेहरा बनले. त्यांनी समाजात जातीय आणि सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी काम सुरु केले. 1952 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. कर्पूरी ठाकूर 1952 मध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले. 1967 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये प्रथमच बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले.

महामाया प्रसाद सिन्हा हे मुख्यमंत्री झाले तर कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री झाले. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची फी रद्द केली होती आणि इंग्रजीची अटही रद्द केली होती. काही काळानंतर कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री झाले. या काळात ते सहा महिने सत्तेत होते. शेतकर्‍यांसाठी त्यांनी बरेच काम केले. उर्दूला राज्यभाषेचा दर्जा त्यांनी दिला. त्यांची राजकीय ताकद प्रचंड वाढली आणि बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकूर समाजवादाचा एक मोठा चेहरा बनला.

Protected Content