जिल्हयात ३४ हजार ६०९ मतदार वाढले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हयात गेल्या वर्षभरात राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ३४ हजार ६०९ मतदार वाढले आहेत. त्यात १८ ते १९ वयोगटातील युवक मतदार २१ टक्के वाढला आहे. जिल्ह्यात एकूण ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. ही अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला ही यादी ग्राह्य असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. सध्या पुरुष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. ३४ हजार ६०९ मतदार वाढले आहेत. त्यात पुरुष मतदार १२ हजार ७१७ तर महिला २१ हजार ८८०, तृतीय पंथीय मतदार १२ वाढले आहेत. नवमतदार (१८ ते १९ वय) १० हजार ५७१ वाढले आहेत. २० ते २९ वयोगटातील १ हजार ४२६ मतदारांची घट, दिव्यांग २८१ घट तर ८० वयोगटावरील ९ हजार ७३३ एवढी घट झाली आहे.

जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात १०६९ व ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असतील. कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या १५०० च्या वर आहे.

१७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन केले आहे. दुर्गम भागातील १६ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही. जिल्ह्यात ९ हजार ३३९ बॅलेट युनिट, ५ हजार ४५० कंट्रोल युनिट आणि ५ हजार ७३३ व्हीव्हीपीएटी मशिन उपलब्ध आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाख ४० हजार ८८२ इतकी आहे. यात ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये १८ लाख १२ हजार ७ पुरुष तर १६ लाख ७८ हजार ९५६ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी १३५ मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग १९ हजार २११ मतदार आहेत. ८० वर्षांवरील वयोमान असलेले १ लाख तीन १२९ मतदार आहेत.

सर्व मतदान केंद्रावर पाणी, वीज, पंखा, टॉयलेटची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. रॅम्पचीही व्यवस्था आहे. नागरिकांसाठी तहसिल कार्यालय, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीत मतदार याद्या लावलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ही यादी पहावयास मिळेल. त्याची पाहणी करून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. नाव नसेल तर लागलीच अर्ज भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे. जे मतदार दिव्यांग, वयोवृद्ध असून बेडवर झोपून आहेत, अशांसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध आहे. फॉर्म १२डी द्वारे संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल.

Protected Content