सगेसोयरेला लागू केल्यास ओबीसी बहूजन पार्टीने दिला आंदोलनाचा इशारा

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रकाश शेंडगे यांनी सत्ताधा-यांसोबतच विरोधकांनाही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून धारेवर धरले आहे. ‘जो ओबीसी आरक्षणाला विरोध करेल आणि सगेसोयरेचा जीआर काढेल त्यांचे आमदार हम चुन चुन के गिराएंगे, तसेच जो ओबीसी की बात करेगा वही इस राज्य पर राज करेगा’ असा इशाराच शेंडगे यांनी दिला आहे.

दरम्यान, लोकसभेची धामधूम शमल्यानंतर आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास राज्यभर ओबीसी आंदोलनाचा वणवा पेटणार असल्याचा हुंकार ओबीसी नेत्याने भरला आहे. सगेसोयरेचा जीआर काढणार त्यांना विधानसभेत जागा दाखवणार असे सूचक वक्तव्य ओबीसी नेत्याने केले आहे. राज्यात आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. सरकारने १० टक्के आरक्षणाची तरतूद करूनसुद्धा ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत.

तर सगेसोय-यांची तरतूद करण्यासाठी देखील जरांगेंनी सरकारकडे तगादा लावला आहे. याविरुद्ध ओबीसी नेत्यांनी देखील उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याला विरोध दर्शवत वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेला ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी रात्री प्रकाश शेंडगे यांनी वडीगोद्री येथील उपोषणस्थळी भेट दिली. यादरम्यान राज्यभर ओबीसी आंदोलनाचा वणवा पेटणार असल्याचा हुंकार शेंडगे यांनी भरला आहे. राज्यातील ओबीसी आक्रमक झाल्यावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्व जबाबदारी सरकारची असेल असा इशारा देखील शेंडगे यांनी दिला आहे.

Protected Content