नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नीट-यूजी परीक्षेचा सुधारित निकाल नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) जाहीर केला. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले होते त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २३ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आल्यानंतर आता नवी गुणवत्ता यादीही जाहीर झाली. जुन्या गुणवत्ता यादीत ६७ टॉपर होते, त्यांची संख्या नव्या गुणवत्ता यादीत ६१ पर्यंत खाली घसरली आहे. फेरपरीक्षेसाठी १,५६३ उमेदवारांपैकी ८१३ जण म्हणजे ५२ टक्के लोक उपस्थित व ४८ टक्के जण अनुपस्थित होते.
चंडीगड केंद्रावर दोन विद्यार्थी फेरपरीक्षा देणार होते, पण ते गैरहजर राहिले. झज्जर येथील परीक्षा केंद्रांवर ४९४ पैकी २८७ विद्यार्थ्यांनी म्हणजे ५८ टक्के जणांनी फेरपरीक्षा दिली होती. हरयाणा केंद्रातील सहा विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणांच्या बळावर १०० टक्के गुण मिळविले होते, असा आरोप झाला होता. या परीक्षेत दिलेले ग्रेस गुण रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर फेरपरीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला. नीट-यूजी परीक्षेत ६७ जणांनी ७२० म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळविले होते. मात्र फेरपरीक्षेतील एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत.