आपण पैसे काढण्याची सुविधा असणार्या एटीएमचा नियमित वापर करतो. मात्र आता याच पध्दतीत मेडिकल एटीएस असेल यावर आपला विश्वास बसणार नाही. तथापि, आता एका कंपनीने याच प्रकारची सुविधा देण्याचे जाहीर केली आहे.
संस्कारी टेक सोल्युशन्स या स्टार्टप कंपनीने स्वयम हे मेडिकल एनीटाईम हेल्थ मॉनिटरींग अर्थात एएचएम हे मशिन तयार केले आहे. हे एक प्रकारचे मेडिकल एटीएम असणार आहे. अर्थात, यात पैशांऐवजी पॅथालॉजीच्या सुविधा मिळणार आहेत. यात एकाच ठिकाणी विविध रोगांचे निदान करता येणार आहे. यात अगदी साध्या रक्तगट तपासणी, हिमोग्रामपासून ते मलेरिया, डेंग्यू, कावीळ, टायफाईड, एचआयव्ही, इसीजी, कान व त्वचेचे परीक्षण आदींसह तब्बल ५६ चाचण्या एकाच ठिकाणी करता येणार आहेत. यात रूग्णाला अवघ्या काही मिनिटांमध्येच कागदी आणि ई-रिपोर्ट मिळणार आहेत. पारंपरीक पॅथॉलॉजी लॅब्जमध्ये रिपोर्ट मिळण्यासाठी उशीर लागत असल्याच्या पार्श्वभूमिवर, अवघ्या काही मिनिटांमध्ये मिळणारी ही सुविधा रूग्णांना लाभदायक ठरू शकते. यासाठी संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक असले तरी ते वापरण्यासाठी खूप सुलभ आहे. यामध्ये भारतीय भाषांचा सपोर्ट आहे. यात संबंधीत रूग्णाचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येत असून याची माहिती गोपनीय ठेवली जाते. कोणतीही टेस्ट केल्यानंतर संबंधीत विभागाच्या डॉक्टरशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सल्ला प्रदान करण्याची सुविधाही या कंपनीने दिली आहे. यातील डिजीटल मेडिकल रिपोर्ट हे एका अॅपच्या माध्यमातून संग्रहीत करण्याची सुविधाही दिलेली आहे.
या मेडिकल एटीएमला आटोपशीर जागा लागत असून याला बिझनेस पार्क, व्यापारी संकुले, ग्रामीण रूग्णालये, गृहनिर्माण प्रकल्प, पेट्रोल पंप्स आदींमध्ये लावता येणार आहे. पहिल्या टप्प्यात इंदूर, भुवनेश्वर, गुरगाव आदींमध्ये याला लावण्यात आले असून लवकरच देशातील अन्य शहरांमध्ये याला स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती संस्कारी टेक सोल्युशन्सतर्फे देण्यात आलेली आहे.