कॉंग्रेसचे आमदार आज मुंबईला येणार ; राष्ट्रवादी करणार सत्ता स्थापनेचा दावा?

ncp congress
मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आज सायंकाळी जयपूरहून मुंबईला परत येणार असून रद्द झालेली कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील बैठकही होणार आहे. त्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणानुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापण्याचा दावा करणार, अशी चर्चा सुरु  झाली आहे.

 

आमदारांना आमिष दाखवून फोडले जाण्याच्या भीतीने काँग्रेस पक्षाने त्यांना जयपूरला ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आज सकाळी दिल्लीला बैठक होणार होती. परंतू ही बैठक अचानक रद्द झाल्याचे वृत्त समोर आले होते. दुसरीकडे सरकार स्थापण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणानुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापण्याचा दावा करणार का?, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अर्थात, यासाठी शिवसेनेला पाठिंब्याकरिता राजी करावे लागेल. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबतचा पेच कायम असल्याचे चित्र आहे. तशातच आता काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आज सायंकाळी जयपूरहून मुंबईला परत येणार असून रद्द झालेली कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील बैठकही होणार असल्यामुळे सायंकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १०५ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, महायुतीमधील शिवसेना सत्तेत समसमान वाटपासाठी आग्रही असल्याने सत्तेचा पेच अद्यापही कायम आहे. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करायची असल्यास बहुमतासाठी आणखी आमदार कमी पडत आहेत. यासाठी भाजप आपल्या आमदारांना आमिष, प्रलोभनं दाखवून फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्वच्या सर्व आमदारांना जयपूर येथे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Protected Content