मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडी सरकारचा निर्णय बदलत आता नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट नागरिकांमधून निवडून येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट जनतेतून निवडून येतील असा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून आधीप्रमाणेच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडून जातील असा निर्णय घेतला होता. राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्षपदांची निवड होईल असे मानले जात होते. यावर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढील निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट जनतेतून निवडून येणार असल्याचे जाहीर केले. यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकर्यांना आता थेट मतदान करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे नगरपालिकांमधील समीकरण पूर्णपणे बदलणार असून निवडणुका पुढे ढकलण्यात येतील हे देखील स्पष्ट झाले आहे.