आता दिल्लीकरांना दोन महिने मोफत मिळणार अन्नधान्य

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने येथील नागरिकांना दोन महिने अन्नधान्य देणार आहे. तसेच टॅक्सी आणि रिक्षाचालकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीत 72 लाख लोकांकडे रेशनकार्ड असून या लोकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. याशिवाय दीड लाख टॅक्सी तसेच रिक्षाचालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. दोन महिने धान्य दिले जाणार आहे, याचा अर्थ दोन महिने लॉकडाउन लागणार, असा होत नाही, असे स्पष्ट करून केजरीवाल पुढे म्हणाले की, परिस्थिती लवकर सुधारावी आणि जनजीवन सुरळीत व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. दिल्लीतील कोरोनाचे संकट भीषण असून जे लोक इतरांना मदत करू शकतात, त्यांनी तशी मदत अवश्य करावी. कुणाला जेवण पोहोचवयाचे असेल, कुणाला ऑक्सिजन, बेड, सिलेंडर अथवा अन्य कोणतीही गरज असेल तर तशी मदत केली जावी.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिल्लीला अक्षरशः पिळवटून टाकले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दैनिक रूग्ण संख्या 20 हजारांच्या आसपास येत आहे. मृतांचा आकडादेखील भयावह आहे. गेल्या चोवीस तासात दिल्लीत चारशेपेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने बळी घेतला होता.

Protected Content