आता येणार पाच स्तरांचा ‘एन 95’ मास्क !

कानपूर – कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी आता तब्बल पाच  स्तरांचा ‘एन 95’ मास्क तयार करण्यात आला असून तो लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. 

कोरोना विषाणूपासून संरक्षण करणारा मास्क आता अधिकच सुरक्षित बनला आहे. येथील एक उद्योजक सुनील शर्मा यांनी पहिल्यांदाच पाच स्तर असलेला ‘एन-95 फिल्टर’ मास्क बनवला आहे. 

या मास्कमध्ये ‘नॉन वोवन स्पन बाँड’चे दोन स्तर, फिल्टर मीडियाचे दोन स्तर आणि हॉट एअर कॉटनचा एक स्तर आहे. सर्वात वर असलेला ‘नॉन ओवन स्पन बाँड’ स्तर कोणत्याही प्रकारच्या द्रवास रोखते. सुनील शर्मा यांनी चार महिने संशोधन करून या मास्कचे डिझाईन बनवले. आता रोज 50 हजार मास्क बनवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. हे मास्क देशातील रुग्णालये व मेडिकल स्टोअरमध्ये पाठवले जातील तसेच परदेशातही त्यांची निर्यात होईल. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर अशा प्रकारच्या मास्कला अनेक प्रकारच्या चाचण्यांमधून जावे लागते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मास्क वापरासाठी सज्ज होतो. या मास्कमध्ये 0.3 मायक्रॉनच्या फिल्टर मीडियाचा वापर करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा सरासरी आकार 0.06 ते 1.4 मायक्रॉन असतो. यामुळे हा मास्क कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मानले जात आहे.

Protected Content