महाजनादेश यात्रेत कडकनाथ कोंबड्या फेकून निषेध करणाऱ्यांना नोटीसा

Mahajanadesh yatra Kadaknath

सांगली प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपने राज्यभर महाजनादेश यात्रा काढली होती. ही यात्रा सांगलीत आलेली असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला कडकनाथ कोंबड्या दाखवत निषेध करण्यात आला होता. यासंदर्भात ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणाऱ्यांना तडीपारीची नोटीस नुकतीच देण्यात आली आहे.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणाऱ्यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे. यात स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडेंसह वाळवा तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या नोटीसमुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घोटाळ्यातील आरोपींना पकडून शिक्षा करण्याऐवजी जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांनाच दडपले जात असल्याचा आरोप स्वाभिमानीने केला आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा इस्लामपूर येथून पलूसला जात असताना हा प्रकार घडला. ताफ्याला कोंबड्या दाखवत असल्याचे दिसताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली आणि रस्त्याच्या बाजूला ढकलले. त्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील कडकनाथ कोंबड्या ताफ्यावर फेकल्या होत्या. पोलिसांनी कोंबड्या फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली होती.

कोंबड्या फेकणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले होते, ‘कडकनाथ घोटाळ्यातील सर्व आरोपींची संपत्ती जप्त करावी आणि दोषींना शिक्षा द्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची या घोटाळ्यात फसवणूक झाली त्यांना नुकसान भरपाई मिळावी. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कडकनाथ कोंबड्या सोडल्या आणि अंडी फोडली’. महारयत अॅग्रो कंपनीने आमिष दाखवून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यानंतरच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे.

Protected Content