Home Cities पाचोरा श्री गणेश मूर्तींची उंची नव्हे, विचारांची उंची वाढवा – आ. किशोर पाटील 

श्री गणेश मूर्तींची उंची नव्हे, विचारांची उंची वाढवा – आ. किशोर पाटील 

0
144


पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोऱ्यात येणाऱ्या गणेशोत्सव, ईद, नवरात्र यांसारख्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत श्री गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि शांततेत साजरा होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी गणेश मूर्तींची उंची न वाढवता आपल्या विचारांची उंची वाढवण्याचा मोलाचा सल्ला दिला.

श्री गणेशाच्या मूर्ती मोठ्या करण्याच्या स्पर्धेमुळे अनेकवेळा अपघातासारख्या घटनांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मूर्तींची उंची कमी ठेवावी आणि भक्तीभाव मनात असावा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात महावितरण विभागाने संध्याकाळी ५ ते रात्री १२ दरम्यान कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी महिलांचा उत्सव व्यवस्थापनातील सहभाग वाढवावा, असे सांगताना गणेश मंडळांनी महिलांना खजिनदारसारख्या जबाबदाऱ्या द्याव्यात, अशी सूचना केली. महिलांचा सहभाग असलेले कार्यक्रम अधिक शिस्तबद्ध व शांततेत पार पडतात, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी महसूल व नगरपालिका विभागांनी ‘एक खिडकी योजना’ राबवावी जेणेकरून मंडळांना सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळू शकतील, असे सुचवले. तसेच प्रत्येक गणेश मंडळास एक पोलीस कर्मचारी नियुक्त केल्यास कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

शहरात सध्या सुरु असलेल्या कामांचा आढावा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सादर केला. तहसीलदार विजय बनसोडे यांनी गणेश मंडळांशी संवाद साधत सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले, तर बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

बैठकीस जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सण साजरे करताना सामाजिक सलोखा, कायदा-सुव्यवस्थेचे भान आणि जबाबदारी यावर भर देण्यात आला.


Protected Content

Play sound