मुंबई, वृत्तसंस्था | ‘१० रुपयात पोटभर जेवण’ ही महाराष्ट्र सरकारची योजना त्यातील अटीशर्तींमुळे विरोधकांच्या टीकेच्या रडारवर आली आहे. ‘शिवभोजन योजनेच्या अटी बघूनच भूक मरेल. शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा,’ अशी घणाघाती टीका नीलेश राणे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्या वचननाम्यात १० रुपयात भोजन देण्याचे वचन राज्यातील जनतेला दिले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली सरकार आल्याने या योजनेला गती मिळणार हे अपेक्षित होते. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र, सर्वसामान्यांना शिवभोजन थाळी मिळवणे खूपच जिकिरीचे होणार आहे. कारण, या योजनेत अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यावरून नीलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
‘शिवभोजन योजनेतील अटी बघूनच माणसाची भूक मरेल. शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा, असे त्यांनी सुचवले आहे. सरळ हाताने काही मिळेल, अशी अपेक्षा या सरकारकडून कुणी करू नये,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.