शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | विनापरवाना बंद पुकारल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यासंदर्भात ८ जून रोजी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात पुन्हा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

तेरा-चौदा वर्षापूर्वी २००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावर कल्याण कोर्टाच्या आदेशानुसार राज ठाकरेवर अटकेची कारवाईदेखील करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बंद पुकारत दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले होते.

याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून शिराळा कोर्टाने २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी एप्रिल महिन्यात वॉरंट बजावले होते. परंतु राज ठाकरेंना करोनाची लागण झाल्याने बुधवारी ८ जूनच्या सुनावणीवेळी ते गैरहजर राहिले. यावेळी मनसेचे नेते शिरीष पारकर मात्र सुनावणीवेळी उपस्थित असल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर राज ठाकरेंना ११ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले असून राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!