बुलढाण्यात लोकसभेच्या उमेदवारीपासून महिला वंचित ! : यंदा कोंडी फुटणार का ?

बुलढाणा-अमोल सराफ | माता जिजाऊंची जन्मभूमी असणार्‍या बुलढाणा जिल्ह्यातून गेल्या ६० वर्षात एकाही महिलेस लोकसभेची उमेदवारी मिळाली नसून यंदाच्या निवडणुकीत तरी ही कोंडी फुटणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लवकरच लोकसभेचे निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे आणि त्यापूर्वी आता प्रत्येक पक्षाकडून कोणता उमेदवार द्यायचा याचा लेखाजोखा अंतिम स्वरूप देण्यास लगबग सुरू झाली आहे. यातच जागतिक महिला दिनाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्याला एक प्रश्न सतत सतावत आहे तो म्हणजे जिल्ह्याला कमीत कमी अद्याप कोणता महिला खासदार प्रतिनिधी मिळाला नाही किंबहुना उमेदवारी दिली गेली नाही याचीच ! यावेळेस अनेक सरप्राईज उमेदवार दिल्या जातील असं सर्वत्र चर्चा असताना जिल्ह्यात सुद्धा असंच काहीच महिला उमेदवार देऊन कोणता पक्ष पुढाकार घेतो व ही कोंडी फोडतो याची चर्चा देखील सुरू झाली आहे.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप आणि उमेदवारीचा मुहूर्त आता नजीक आला आहे. जागतिक महिला दिनाच्या आसपास देणारा हा मुहूर्त बुलढाण्याची दीर्घकालीन ’सामाजिक कोंडी फोडणार काय?, असा यक्ष प्रश्न ऐरणीवर आला आहे. सहा दशकांतील लढतीत उपेक्षित असलेल्या महिलांना यंदा तरी ’दिल्ली साठी’ उमेदवारी मिळणार का हा तो प्रश्न आहे.

लक्षणीय बाब म्हणजे ९५७ पासूनच्या आजवरच्या लोकसभा निवडणुकीत एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही हे चित्र कायम राहिले. महिलांच्या सक्षमीकरण मध्ये आघाडीवर असलेल्या कॉंग्रेसने देखील महिलांना संधी नाकारली. अगदी १९५७ पासून ते बुलढाण्यात कॉंग्रेसने लढलेल्या सन २००४ च्या अंतिम लढतीपर्यंत पक्षाने. महिलांना डावलले!

तत्कालीन भारतीय जनसंघ, रिपब्लिकन पक्ष यांनीही महिलांचा विचार केला नाही. आणीबाणी नंतर स्थापन झालेल्या भाजपने आजवर लढविलेल्या एकमेव लढतीत महिलेचा विचार केला नाही. चार लढतीसाठी एकसंघ राष्ट्रवादीने तर सन १९९६ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुका लढविताना शिवसेनेने महिलांचा विचार करण्याची तसदी घेतली नसल्याची ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. जवळपास ६० वर्षे सुरू असलेली महिलांची राजकीय उपेक्षा २०२४ च्या रणसंग्रामात तरी खंडित होणार काय? हा राजकीय प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झालेल्या मागील १६ लढतीत संधी तर सोडाच, पण महिलांच्या उमेदवारीवर चर्चा सुद्धा करण्यात आली नाही. त्या तुलनेत यंदा किमान महिलांच्या – उमेदवारीची चर्चा असणे, हाच काय तो माता भगिनींना दिलासा आहे. यात बुलढाण्याची जागा भाजपला सुटली तर, आमदार श्वेता महाले यांचे नाव आघाडीवर आहे. कॉंग्रेसला सुटली तर जयश्री शेळके यांना संधी मिळू शकते. किंबहुना शिवसेना (उबाठा) ने जागा कॉंग्रेसला सोडली तर ते शक्य होईल. तसेच संभाजी ब्रिगेड ला सुटली तर माजी आमदार रेखा खेडेकर यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो.

अनेक वेळा बाहेरील आयात उमेदवार आणून देखील या जिल्ह्याने त्याला निवडून दिले आहे पण मातृतीर्थ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिला उमेदवार दिला गेला नाही याची खंत आजही जिल्हा सतावत आहे. फक्त महिलांच्या बाबत मोठमोठ्या घोषणा त्यांना सबलीकरण दिल्या जाणार्‍या सुविधा आरक्षण याबाबत मोठमोठ्या गप्पा केल्या जातात. पण त्यांचं थेट प्रतिनिधित्व करण्याकरिता १९५७ पासून अद्याप या मातृतीर्थ जिल्ह्याला का प्रतीक्षा करावी लागत आहे हा देखील एक मोठा प्रश्नच म्हणावा लागेल. ही कोंडी किमान २०२४ सालच्या निवडणुकीत तरी फुटावी ही अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content