मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना आमदारांच्या फोडाफोडीच्या शंकेवरून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये हलवण्याच्या वृत्तावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार याचा पुनरुच्चाही राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मातोश्री येथे बैठक आयोजित केली असून, सर्व आमदारांना ते मार्गदर्शन करणार असल्याचे राऊत म्हणाले. उद्ध ठाकरे शिवसेनेच्या आमदारांशी बोलतील, त्यांना विश्वासात घेतील. राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, शिवसेनेची त्यावर काय भूमिका आहे, याबाबत उद्धव ठाकरे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहे. काही पक्षांमधील लोकांनी आम्हाला सांगितले की, शिवसेनेच्या आमदारांना संपर्क केला जात आहे, आमिष दाखवले जात आहे. या मुळे आम्ही खबरदारी घेत आहोत. देशात आमदारांना फोडण्याचे काम अनेक राज्यांमध्ये झालेले आपण पाहिलेले आहे. ज्यांच्याकडे सत्ता असते, यंत्रणा असते ते लोक असे हातखंडे वापरत असतात. मात्र, स्वच्छ राज्यकारभार करण्याचे अभिवचन देणाऱ्यांनी असे हातखंडे वापरू नये, असा चिमटाही राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला काढला. मात्र, शिवसेनेचेच काय पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशा विरोधी पक्षांचे आमदारही आता फोडण्याची कुणाची हिम्मत नसल्याचे राऊत यांनी ठासून सांगितले.