चिपळूण | आपण केलेले वक्तव्य हे गुन्ह्याच्या कक्षेत येत नसल्याचे नमूद करत आपल्यावर कुठे गुन्हा दाखल झाल्याची माहिती नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
राणेंच्या वक्तव्याने राज्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे. यातच जनआशिर्वाद यात्रेसाठी चिपळूणमध्ये दाखल झालेल्या नारायण राणे यांनी येथे पहिल्यांदा पत्रकारांशी बोलणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार राणे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. याप्रसंगी नारायण राणे म्हणाले की, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आपल्याला नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालेला असल्याचे पुरावे द्या, यानंतरच याच्या बातम्या द्याव्यात असे राणेंनी बजावले. नाशिक येथील भाजपच्या कार्यालयावर दोन दगड मारले म्हणजे फार काही पुरूषार्थ नाही. ज्या वेळेस उध्दव ठाकरे थोबाड फोडा असे म्हणाले तेव्हा का गुन्हा दाखल झाला नाही ? असा प्रति प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.
उध्दव ठाकरे यांना देशाचा अमृत महोत्सव माहित नसणे हा देशद्रोह आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील राणे यांनी केले. आपण जे बोललो ते क्रिमीनल ऑफेन्स नसल्याने गुन्हा दाखल होणे व अटकचा प्रश्नच उदभवत नसल्याचे नारायण राणे म्हणाले. आमचे सरकार देखील वर असून ते किती उडी मारतात हे आपण पाहू असे देखील ते म्हणक्षाले.
राणे पुढे म्हणाले की, जनआशिर्वाद यात्रा नियोजनानुसार सुरूच राहणार आहे. आज आमचे ऑफीस फोडले असले तरी उद्या आमची माणसे कुणाच्या घरापर्यंत पोहचली तरी काय करणार ? असा प्रश्न त्यांनी विचारला.