नारायण राणे हे नारळासारखे ! : चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण

मुंबई प्रतिनिधी | केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नारळासारखे असून ते बाहेरून कठोर असले तरी मधून मऊ असल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अवमान केल्याचे प्रकरण आता प्रचंड वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यावरून महाड, नाशिक आणि पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली. यानंतर नाशिक पोलिसांकडून नाारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. यातच आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेत्यांनी राणेंना लक्ष्य केल्याचे असतांना आता राणेंच्या मदतीला भाजप नेते धावून आल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाची वेगळी शैली असते. नारायण राणेंचीही आहे. मी त्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यासाठी थेट अटक? अटक करणं कितपत योग्य आहे? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती. मात्र थेट अटक करणं योग्य नाही. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यातही त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. नीलम गोर्‍हे सभापती असून त्या राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा, की तुम्ही सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे का?

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, नारायण राणे हे नारळासारखे आहेत. वरून कठोर असले तरी ते आतून मऊ मनाचे आहेत. त्यांना वाटलं तर ते बोलतील. पण त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? आम्ही काही आडमुठे नाही. आम्हाला तेवढं महत्त्वाचं वाटलं तर विचार करु. पण राणेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होतील याचा विचार सरकारने केला आहे का? राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. त्याबद्दल त्यांनी विचार केला आहे का? असा प्रश्‍न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

Protected Content