जळगाव प्रतिनिधी । येथील विविध मुस्लिम सामाजिक संस्था, संघटना व बिरादरीच्या पदाधिकारी व प्रतिनिधीतर्फे अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री यांच्या अभिनंदनाचे पत्र वजा विविध मागण्यांचे निवेदन मुस्लीम समुदायतर्फे देण्यात आले.
या निवेदनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांसह ना. गुलाबराव पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्रिपदी आणि जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन सर्वांना समान संधी, न्याय, वागणूक द्यावी. आणि लोकाभिमुख, पारदर्शी व गतिमान राज्यकारभार करावे, अशी आशा व अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) असंविधानिक असून हा कायदा लागू करण्यास नकार दिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला नकार कळवावा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) यांच्या प्रक्रिया आणि डिटेंशन सेंटरची परवानगी रद्द करावी, तसेच राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी आणि अल्पसंख्यांकांच्या हिताचे व हक्काचे संरक्षण व्हावे, तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचे प्रश्न व समस्या जलदगतीने सुटून त्यांना न्याय मिळावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
सत्कार करतांना व निवेदन देतांना मुस्लिम समन्वय समिती जिल्हाध्यक्ष अशफाक पिंजारी, अमन एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सैय्यद शाहिद, कादरिया फॉउंडेशनचे फारूक कादरी, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष नजीर खान मुलतानी, जळगाव मनपा प्रभाग समिती क्र.३चे सदस्य फिरोज खान मुलतानी, खान्देश टू व्हिलर असोसिएशनचे अध्यक्ष अशफाक मिर्ज़ा, परवाझ फाऊंडेशनचे अध्यक्ष शरीफ बाबा, पिंजारी युवा बिरादरीचे उपाध्यक्ष रोशन पिंजारी, ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे झोनल सेक्रेटरी शकील टिक्की, लब्बैक फाउंडेशनचे अध्यक्ष रईस बागवान, जळगाव जिल्हा काकर समाज अध्यक्ष रियाज़ काकर, अमन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अल्ताफ़ मन्यार, खाटीक बिरादरीचे अध्यक्ष कासीम खाटीक, शिकलगर समाज अध्यक्ष अन्वर सिकलीग, सहयोग बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष युसुफ खान, सहेली ग्राम महिला बचत गट संघटनाच्या अध्यक्षा मुन्नी शकील मन्यार आणि शाह छप्परबंद जमातचे अध्यक्ष शरीफ शाह यावेळी उपस्थिती होते.