Home धर्म-समाज देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकणार – शहा

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकणार – शहा

0
110


amit shaha

जबलपूर, वृत्तसंस्था | जेएनयूमधील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज, रविवारी जबलपूरमधील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा शहा यांनी दिला आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजप अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, कलम ३७० रद्द करणे, एनआरसी आदी मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य केले. जेएनयूमधील आंदोलनावरही शहा यांनी भाष्य केले. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवे की नको, अशी विचारणा त्यांनी सभेला उपस्थित असणाऱ्या जनतेला केली. त्यानंतर राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत, असेही शहा म्हणाले.

यावेळी नागरिकत्व कायद्यावरून शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. कितीही विरोध करा, पण आम्ही सर्वांना नागरिकत्व देणार आहोत. भारतावर जितका अधिकार माझा आणि तुमचा आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींचा आहे, असे शहा म्हणाले. आज काँग्रेस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देतो की, त्यांनी या कायद्यात नागरिकत्व हिरावून घेणारी एखादी तरतूद तरी आहे का, हे शोधून दाखवावे. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, नागरिकत्व हिरावून घेणारा नाही, असेही शहा म्हणाले. व्होटबँकेच्या राजकारणामुळे हे सर्व विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.


Protected Content

Play sound