मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नसल्याचे सांगत मीडियाने या प्रकरणी गोंधळ उडवू नये असे प्रतिपादन आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापनेबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता येणार असून लवकरच याबाबत घोषणा होईल. अद्याप सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे स्पष्ट करून मीडियाने या प्रकरणी गोंधळ उडवू नये असेदेखील ते म्हणाले. सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीतील चर्चा यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येणार असून यात पदांच्या वाटपाबाबत चर्चा होईल. यानंतर तातडीने सरकार स्थापन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खर्या अर्थाने सेक्युलर होते. यामुळे इतरांनी आम्हाला निधर्मीपणा शिकवू नये असा टोला मारला. तर संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा चपखल ट्विट केले. यात त्यांनी म्हटले आहे की, हम बुरे ही अच्छे है…जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिला था !! यातून त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावल्याचे मानले जात आहे.