मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नगर परिषद आणि पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत. नवीन सरकारने यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.
याविषयी नाना पटोले म्हणाले की, “तत्कालीन फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यास जबाबदार असून त्यांनी सत्तेत असताना ओबीसींचे आरक्षण संदर्भात प्रयत्न केले नाहीत. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची गुंतागुंत वाढली. कोर्टाने इम्पिरिकल डाटा मागितल्यावर केंद्र सरकारने डाटा देण्यास नकार दिला. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारने जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारची अडवणूक केल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचे सांगत आतातरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी आरक्षण प्रश्नी मध्यस्थी करून ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करावं अशी विनंती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली.