जिल्ह्यात युती. . .पाचोरा-भडगावमध्ये माती ! : बाजार समितीत विधानसभेची रंगीत तालीम

भडगाव-धनराज पाटील | एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात भाजप व शिवसेनेची युती होत असतांना पाचोरा-भडगाव बाजार समितीत मात्र भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने येथे युतीची माती झाल्याचे दिसून येत आहे.

कुणी कितीही बाता मारल्या तरी पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमीलन कदापी शक्य होणार नसल्याच्या अनेक घटना घडत आहेत. सध्या राज्यात दोन्ही पक्ष सत्तेत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र आमदार किशोर पाटील आणि त्यांना गेल्या निवडणुकीत जबरदस्त तगडी फाईट देणारे अमोल शिंदे यांच्यातून मात्र विस्तव देखील जात नसल्याची बाब उघड आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची धामधुम सुरू झाली असून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्रीतपणे लढतील असे जाहीर केले आहे. बर्‍याच ठिकाणी याला विरोध असला तरी दोन्ही मंत्र्यांच्या दबावामुळे उघडपणे कुणी काहीही बोलत नाही. तथापि, पाचोरा-भडगावात मात्र अमोल शिंदे यांनी स्वबळाचा नारा देऊन ही कोंडी फोडली आहे.

आज अमोल शिंदे यांनी एक पत्रक जारी केले असून यातून त्यांनी आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भारतीय जनता पक्षा स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यात त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. आमदारांना फक्त निवडणुकीच्या काळात भाजप आठवतो असा टोला देखील त्यांनी मारला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे किशोर पाटील, राष्ट्रवादीतर्फे दिलीप वाघ तर अमोल शिंदे अपक्ष अशी लढत झाली होती. यात किशोर पाटील यांचा अल्प मतांनी विजय झाला होता. अर्थात, विजयासाठी त्यांना अमोल शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात दमविले होते. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि कॉंग्रेसने आधीच महाविकास आघाडीची घोषणा केली असून शिवसेनाही स्वतंत्र लढवणार आहे. तर अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप देखील स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे. यामुळे ही निवडणूक म्हणजे पुढील विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Protected Content