अहमदनगर प्रतिनिधी । आपल्या विनोदी किर्तनामुळे अलोट लोकप्रियता मिळालेले निवृत्ती महाराज इंदोरीकर आता राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत मिळाले असून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची किर्तने तुफान लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या कार्यक्रमांच्या किमान दोन वर्षाच्या तारखा आजच बुक असल्याची माहिती आधीच समोर आलेली आहे. तर सोशल मीडियातही महाराज सुपरहिट असल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. या पार्श्वभूमिवर, आता महाराज राजकीय मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान संगमनेर येथील सभेत त्यांनी व्यासपीठावर हजेरी लावल्याने राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला धनादेश प्रदान केला. यासोबत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करून त्यांच्यासोबत बराच वेळ चर्चादेखील केली.
संगमनेर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची घट्ट पकड आहे. १९८५ पासून ते येथून निवडून येत आहेत. सक्षम उमेदवार नसल्याने थोरात यांना आव्हान देण्याचे वेळोवेळी झालेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. या पार्श्वभूमिवर, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यासारख्या लोकप्रिय चेहर्याला समोर करून भाजप हुकमी खेळी करू शकते. याच्या जोडीला थोरातांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांची रसद मिळाली तर थोरात यांना अडचणीत आणण्याची खेळी यशस्वी होऊ शकते. यामुळे इंदोरीकर महाराज हे भाजपसाठी योग्य उमेदवार ठरू शकतात. यामुळे इंदोरीकर महाराजांची राजकीय कारकिर्द लवकरच होऊ शकते असे संकेत आता मिळाले आहेत. याबाबत खुद्द त्यांनी अथवा भाजपच्या सूत्रांनी कोणताही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र याबाबत येत्या काही दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास संगमनेरमधील ‘राजकीय कीर्तन’ चांगलेच रंगणार हे सांगणे नकोच !