पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पारोळा तालुक्यात युवा नेतृत्वाला संधी देत निरंजन भूपेंद्र पाटील यांची पारोळा युवा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शेतकरी आत्महत्या, अवकाळी पाऊस, बोगस बियाणे व खते, तसेच प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या संकटांवर प्रभावी लढा उभारण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज टेहू येथील निरंजन पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणे, कर्जमाफीसाठी संघर्ष करणे आणि धरणांचे पाणी शेत-शिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटित प्रयत्न करणे, या उद्दिष्टांसाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

निरंजन पाटील हे सामाजिक व कृषी क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी एम.कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतीतील अडचणींचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव असून, परिसरातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. पारोळा युवा तालुकाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून संघटनेची ध्येय-धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व कामगार वर्गापर्यंत पोहोचवून शेतकरी हित जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी पुढील पंधरा दिवसांत युवा तालुका कार्यकारिणी जाहीर करून संघटनेच्या कार्यालयात पाठवण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जे शेतकरी संघटनेत सामील होऊन शेतकरी प्रश्नांसाठी कार्य करू इच्छित आहेत, त्यांनी ९८९०८७५२३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमावेळी टेहू येथील धोंडू पाटील, सुनील पाटील तसेच कन्हेरे येथील शुभम पाटील व सागर पाटील उपस्थित होते. निरंजन पाटील यांच्या निवडीबद्दल संघटनेचे कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



