पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । कथित रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक आणि नंतर जामीन मिळाल्यानंतर प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच आता या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी त्यांच्याशी संबंधित सिमकार्ड बदल प्रकरणी त्यांची पत्नी व राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांची पुणे पोलिसांनी सखोल चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच उधाण आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळले आहे. खेवलकर अटकेत असतानाच या सोनारने आपले सीम हरवल्याचा बहाणा करत, त्याच क्रमांकाचे नवीन सीमकार्ड मिळवले आणि नवीन मोबाईलमध्ये घालून महत्त्वाचा डेटा – विशेषतः व्हॉट्सॲपवरील संभाषण – डिलीट केल्याचा गंभीर आरोप पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोनार या व्यक्तीची चौकशी करत असताना त्याने हे कृत्य रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरून केल्याचा खुलासा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तथापि, सोनार नेमका कोण आहे, त्याचा नेमका भूमिका काय आहे याबाबत अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही, त्यामुळे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
याच संदर्भात पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी विभागाने त्यांची सुमारे दीड तास चौकशी केली. चौकशीत त्यांच्या जबाबाची नोंद करण्यात आली असून, या चौकशीनंतर रोहिणी खडसे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची देखील भेट घेतली. ही भेट सुमारे १५ ते २० मिनिटे झाली.
या चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे यांचे वकील पुष्कर दुर्गे यांनी स्पष्टीकरण दिले की, “पोलिसांनी जे काही विचारले त्याचे सर्व उत्तर आम्ही स्पष्टपणे दिले आहेत. फॉरेन्सिक अहवालाने हे स्पष्ट झाले आहे की, आमच्याकडून कोणतेही अंमली पदार्थ वापरण्यात आलेले नाहीत. तसेच पुराव्यांची छेडछाड केल्याच्या आरोपाशी आमचा काहीही संबंध नाही.” त्यांनी हेही नमूद केले की, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक माहिती देणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान, प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, त्यांनी कोणताही अंमली पदार्थ सेवन केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, त्यांच्याशी संबंधित सिमकार्ड प्रकरणामुळे पोलिसांची सखोल चौकशी सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजूनही काही धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



