कोरोनाच्या चाचण्यांसाठी लागणार ‘इतके’ रूपये : जाणून घ्या अचूक माहिती

मुंबई प्रतिनिधी | ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमिवर आज राज्य सरकारने आरटीपीसीआर आदी कोरोनाच्या चाचण्यांचे दर कमी करण्याची घोषणा केली असून आम्ही आपल्याला याबाबतची अचूक माहिती देत आहोत.

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये संसर्गाच्या प्रसाराचा वेग कळणार असून यातील सर्वात मोठा घटक हा अर्थातच कोरोनाच्या चाचण्या होय. या अनुषंगाने आज आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी कोरोनाच्या चाचण्यांचे कमी केलेले दर जाहीर केले आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ३५०, ५०० आणि ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ३५० रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वॉरन्टाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ५०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत.

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २००, २५० आणि ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३००, ४००, ५००असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५०असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी १२०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही.

Protected Content