Home उद्योग ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षणातून उद्योजकतेची नवी संधी : मंत्री मंगलप्रभात लोढा

ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षणातून उद्योजकतेची नवी संधी : मंत्री मंगलप्रभात लोढा


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांनाही आता स्टार्टअप्सच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असलेले राज्य असून, नव्या धोरणानुसार ग्रामीण भागात हजारो उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री लोढा बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विभागाने अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आणि स्टार्टअप धोरण लागू केले आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्वतंत्र कोटा राखण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेऊन या धोरणाचा आढावा घेण्यात आला. यासोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरक महोत्सव समिती आणि आय.एम.सी. सदस्यांची बैठकही घेण्यात आली.

धरणगाव येथील डॉ. हेडगेवार नगरात क्रांतिवीर खाज्याजी नाईक स्मृतिसंस्था आयोजित ‘मुकुंदराज पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्राचे’ उद्घाटन मंत्री लोढा यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत टेलिकॉम एसएससीमार्फत ग्राहक सेवा, मोबाइल हार्डवेअर रिपेअरिंग, डिजिटल मित्र अशा विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच ‘दक्ष प्रकल्पा’अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी स्वतंत्र कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा केली असून, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मदत संस्थांच्या शिफारसीनुसार देण्यात येईल.

राज्यातील ७५ हजार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. विविध भागांत सुमारे एक हजार रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यातील ४१९ आयटीआय विद्यार्थ्यांनी ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवले.

दरम्यान, ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवा’अंतर्गत राज्यातील शासकीय व खाजगी आयटीआय संस्थांमध्ये व्याख्यानं, परिसंवाद आणि चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून पंडितजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवण्याच्या अंत्योदय संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने हे प्रयत्न असल्याचे मंत्री लोढा यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound