अमळनेर (प्रतिनिधी) बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार मुलांना कृतीयुक्त, आनंददायी, बालसुलभ शिक्षण देणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शिक्षणाला दिली तरच शिक्षण मनोवर्धक व उत्साहवर्धक होते, असे नाही तर आपल्या आसपास उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीच्या सहाय्यानेही शिक्षण आनंददायी बालसुलभ होवू शकते. हे येथील सानेगुरुजी नुतन माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक डी.ए. धनगर यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी ‘त्रिमित सुत्रांकुर’ हा कार्यक्रम राबविला आहे. त्याचा परिणाम चांगला दिसून आला असून मूलांनी न्युनगंड झुगारून गणित विषयाबद्दल असलेली अनामिक भिती झुगारून दिल्याचे दिसून येत आहे.
वर्गातील प्रत्येक मुलाने आपल्या परिसरातील व घरातील वस्तुंपैकी त्रिमित आकाराच्या वस्तू जसे की घन, इष्टिकाचीती, वृत्तचिती आकाराच्या वस्तू आणण्याचे आवाहन त्यांनी केले, यावेळी काहींनी तर लाकडी आकाराच्या वस्तू बनवून आणल्या होत्या. यातून मुलांना त्रिमितीय प्रतिमा बघायला मिळाली. आता मुलांना त्रिमितीय आकार कळले होते, पण त्यांचं घनफळ व पृष्ठपळ कसे काढतात? हा प्रश्र्न कायम होता. त्यावर श्री. धनगर यांनी सांगितले की, केवळ सुत्र पाठ न करता आपण सुत्र तयार करु शकतो. फक्त गरज आहे ती विशिष्ट पद्धतीने ते समजावून घेण्याची. त्यानुसार मूलांच्या हातात त्रिमितीय वस्तु देवून अध्ययन अनुभवाद्वारे सुत्रे तयार करण्यात आली. मुलांना हे शिक्षण आनंददायी वाटू लागले व त्यांचा आनंद द्विगुणित झाला. कारण मुलांना सुत्रे कशी तयार होतात? हे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिकायला मिळाले होते.
त्यानंतर श्री. धनगर यांनी मुलांना आवाहन केले की, आपले आकृती संबंधित स्पष्टीकरण या उपक्रमाचे मार्गदर्शक व संस्था सचिव संदीप घोरपडे आणि शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. देशमुख यांच्या समोर सादरीकरण करावयाचे आहे. मुलांनी हे आव्हान स्विकारले व मान्यवरांच्या देखत प्रात्याक्षिक करुन दाखवले व त्याचे यथोचित स्पष्टीकरण सुध्दा केले. त्यावेळी श्री. घोरपडे यांनी मुलांचं व शिक्षकांचे कौतुक केले. या उपक्रमाला गणित शिक्षक सुनील पाटील यांचे सहकार्य लाभले.