बुडापेस्ट-वृत्तसंस्था | भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीराज चोप्रा याने बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावत आपली विजयी मालिका सुरू ठेवली आहे.
नीराज चोप्रा याने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची मोठी कामगिरी पार पाडली आहे. यानंतर सर्व महत्वाच्या स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी ही अतिशय लक्षणीय अशीच राहिली आहे. आता बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत पहिल्याच फेकीत त्याने अंतीम फेरी गाठल्याने देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री उशीरा अंतीम सामना झाला. यात त्याने अपेक्षेनुसार सुवर्णवेध केला.
नीरज चोप्रा हा विश्व अथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. अंतीम फेरीत त्याने त्याच्या दुसर्या प्रयत्नात ८८.१७ मीटरच्या फेकीसह आपल्यासाठी विजेतेपद निश्चीत केले. तर, पाकिस्तानच्या अश्रफ नदीमला दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. अर्थातच, त्याला रौप्यपदक मिळाले.
नीरजच्या यशाचा आलेख हा सातत्याने चढताच राहिला आहे. २०१६ साली त्याने ज्युनिअर वर्ल्ड चँपियनपद पटकावले. यानंतर २०२०च्या ऑलींपीकमध्ये त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. यानंतर आता त्याने जागतिक चँपीयशशिपमध्ये विजेतेपद संपादन केले आहे. अशी कामगिरी केल्यामुळे आता पुढील वर्षी होणार्या ऑलिंपिकमध्ये त्याच्याकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
२४ डिसेंबर १९९७ रोजी हरियाणात जन्मलेल्या नीरज याची आजवरची वाटचाल ही विलक्षण प्रेरणादायक अशीच राहिलेली आहे. टोकियो ऑलींपीकमधील त्याची सुवर्णपदकी कामगिरी ही सर्व भारतीयांना अतिशय प्रेरणा देणारी ठरली आहे. यानंतर डायमंड लीगमध्ये देखील त्याने विजेतेपद पटकावले होते. तर आता जागतिक विजेतेपदावर आपले नाव अंकीत करून त्याने देशाचा गौरव वाढवितांनाच आपल्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.